विधानभवन येथे आढावा बैठक; पुढील सहा महिने अत्यंत महत्त्वाचे : डॉ. सुभाष साळुंके
करोना चाचण्या, बेडची संख्या आणखी वाढणार
पुणे – कोणत्याही परिस्थितीत बाधितांना अत्यावश्यक उपचार मिळाले पाहिजेत. त्यादृष्टीने रूग्णांचे वेळेत निदान होऊन संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी करोना चाचण्यांमध्ये वाढ करावी. रुग्णांसाठी आवश्यक बेड, ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर वाढवा. रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली तर लॉकडाऊनची वेळ येणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. ठराविक निर्बंधांचे पालन करुन सर्व व्यवहार सुरळीत ठेवूनही सुरक्षितता जोपासता येईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विधानभवन येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत करोना परिस्थिती नियंत्रण उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांनी कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. पुढील सहा महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यादृष्टीने नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगितले.
विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रुग्णसंख्या, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या, पलब्ध बेड, लसीकरणाचे आतापर्यंतचे प्रमाण, आयसीयू बेडची संख्या, करोना तपासणी केंद्र, याबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.