वॉशिंग्टन – कॅथोड-रे ची प्क्चरट्युब असलेले पूर्वीचे अवाढव्य टेलिव्हिजन सेट्स आता इतिहासजमा झाले आहेत. मागील दशकात अशा सर्व टेलिव्हिजनची जागा आता फ्लॅटस्क्रीन टीव्हीने घेतली आहे. एलसीडी, एलईडी, प्लाझ्मा स्क्रीन असे अनेक नवे प्रकारही आता आले आहेत. आता टेलिव्हिजन क्षेत्रात एक नवे ऐतिहासिक संशोधन एलजी कंपनीने सादर केले असून पहायचा नसेल अथवा वापरात नसेल अशा वेळी हा टीव्ही चक्क गुंडाळून ठेवता येतो.
एलजी या कोरियन कंपनीने जगातील पहिल्या रोलेबल टीव्हीची (गुंडाळून ठेवता येण्याजोगा) विक्री सुरु केली आहे. त्याला सिग्नेचर टीव्ही देखील म्हटले जाते. या टीव्हीमध्ये 65 इंचाची रोलेबल स्क्रीन आहे. टीव्ही ऑन होताच एका डॉकमधून स्क्रिन बाहेर येते आणि ऑफ केल्यानंतर डॉकमध्ये परत जाते. कंपनीने हा टीव्ही 3 वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण कोरियाच्या बाजारात सादर केला होता. या टीव्हीची किंमत 88,500 डॉलर (सुमारे 64 लाख रुपये) इतकी आहे.
कंपनीने सांगितल्यानुसार, त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरुन जगभरातील लोक हा टीव्ही खरेदी करु शकतील. सुरुवातीला अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्ससह 15 देशांमध्ये याची विक्री केली जाईल.
एलजी रोलेबल टीव्हीची वैशिष्ट्ये
1. हा रोलिंग टीव्ही तीन वेगवेगळ्या मोडमध्ये कार्य करतो, ज्यामध्ये तीन प्रकारचे डिस्प्ले साइज उपलब्ध आहेत.
2. कंपनीने हा टीव्ही डिझाइन करण्यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
3. यूजरने आदेश दिल्यानंतरच एलजीचा हा नवीन टीव्ही दिसू शकेल, अन्यथा टीव्ही त्याच्या तळाशी असलेल्या बेसमध्ये जाईल.
4. या टीव्हीच्या तीन मोडपैकी एक लाइन व्ह्यू मोड आहे ज्यामध्ये या टीव्हीचा केवळ एक चतुर्थांश भाग वरच्या बाजूस दिसतो. याचा यूजर घड्याळ, फोटो फ्रेम, मूड, संगीत आणि होम डॅशबोर्ड म्हणून वापर करु शकतात.
5. क्लॉक मोडमध्ये हे घड्याळासारखे कार्य करेल, फ्रेम मोडमध्ये यूजर यावर आपला फॅमिली फोटो लावू शकतील, जो स्मार्टफोनच्या मदतीने शेअर केला जाऊ शकतो
- टीव्हीच्या “मूड मोड’ने घरात अधिक आरामदायक वातावरण तयार होईल. यूजरला या टीव्हीत ऑनस्क्रीन म्युझिक कंट्रोल मिळते, तसेच घरी इतर स्मार्ट गॅझेट देखील नियंत्रित करता येतील.
- झिरो मोडमध्ये, संपूर्ण 65 इंचाचा टीव्ही बेसमध्ये जातो. झिरो मोडमध्ये, यूजर संगीत आणि ऑडिओचा आनंद घेऊ शकतील. यात 100 वॅटची डॉल्बी एटमोस ऑडिओ सिस्टम आहे.
- फूल व्ह्यूमध्ये मोठ्या स्क्रीनचा संपूर्ण आनंद घेता येईल. टीव्हीमध्ये एलजीचा सेकंड जनरेशनचा अल्फा 9 इंटेलिजेंट प्रोसेसर बसविण्यात आला आहे.
- ऍमेझॉन अलेक्सा फीचरच्या मदतीने व्हॉइसद्वारे हा टीव्ही कंट्रोल केला जाऊ शकतो. यात यूजरच्या सूचनांनुसार तो कार्य करतो. हा ऍपल एअरप्ले 2 आणि होमकिटला सपोर्ट करतो.
- हा जगातील पहिला OLED टीव्ही आहे ज्याची स्क्रीन आपल्या बोलण्याने काम करते. यामध्ये पिक्सेल डिमिंग तंत्रज्ञानाचा वापर डिस्प्ले ऑप्टिमाइझ करण्यासाठी केला गेला आहे, जो सुमारे 3.3 दशलक्ष सेल्फ-इमिटिंग पिक्सेलला सपोर्ट करतो.