पुणे – पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सीरिज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सनत कडले, वीरेन चौधरी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकित सनत कडले याने आठव्या मानांकित क्षितिज अमीनवर 6-0 असा एकतर्फी विजय मिळवला. वीरेन चौधरीने नवव्या मानांकित ईशान ओकचा 6-1 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. अव्वल मानांकित दक्ष पाटीलने आदित्य योगीला 6-0 असे पराभूत केले. सहाव्या मानांकित नमिश हुडने वेद कोटणीसला 6-0 असे नमविले.
सातव्या मानांकित स्वर्णीम येवलेकरने हर्ष परिहारचा 6-0 असा, तर दुसऱ्या मानांकित समीहन देशमुखने रोहन बोर्डेचा 6-1 असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत श्रीया होनकन, आस्मी टिळेकर, अनुष्का जोगळेकर, रित्सा कोंडकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.