पुणे (प्रतिनिधी) – मराठवाड्यातील सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. या गुन्हेगारावर पुणे जिल्हयात रोडरॉबरी व मराठवाड्यात तब्बल ४० गुन्हे दाखल आहेत. कुविख्यात सराईत गुन्हेगारासह एकाला पुणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने लातूर येथून अटक केली आहे.
सदर गुन्ह्यातील तक्रारदार हेमंत करे (रा.पंढरपूर, जि.सोलापूर) व त्याचा मित्र असे दोघेजण स्प्लेंडर मोटरसायकलवर पंढरपूर टेंभुर्णी मार्गे पुणेचे दिशेने निघाले होते. 27 मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील रावणगाव (ता.दौंड, जि.पुणे) गावचे हद्दीत शिवआई मंदिराजवळ आले असताना, दोन अज्ञात इसमांनी त्यांचेकडील बुलेट मोटरसायकल आडवी मारुन तक्रारदार यांची स्प्लेंडरची चावी जबरदस्तीने काढून घेतली.
त्यानंतर हेमंत करे व त्याचे मित्राचा मोबाइल, कागदपत्र असलेली बॅग, रोख रक्कम असा एकूण ६७ हजार ८०० रुपयाचा माल जबरीने चोरुन रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन निघून गेले. त्याबाबत दोन अनोळखी इसमांविरूध्द दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पुणे ग्रामीण एलसीबी पथकाला गोपनीय बातमी मिळाल्याने लातूर येथे जावून सापळा रचून आरोपी ज्ञानेश्वर उर्फ सैराट बालाजी जाधव (वय ३०, रा.रेणापूर जि.लातूर), अर्जुन उर्फ अजय बालाजी जाधव (वय -१९ वर्षे रा.औसा हनुमान, खंडोबा गल्ली, लातूर जि.लातूर) ताब्यात घेण्यात आले.
आरोपींचे ताब्यातून एक बुलेट गाडी, एक स्प्लेंडर गाडी जप्त केली आहे. आरोपी ज्ञानेश्वर जाधव याच्यावर यापूर्वी एकूण 38 गुन्हे दाखल आहे. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.