चलाकुडी – प्रथमच केरळच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर आलेल्या कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज येथील सभेत राज्यातील गृहीणींना साद घालत त्यांचा सन्मान राखण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी घरकाम सांभाळणाऱ्या महिलांना दर महा दोन हजार रूपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले असून केरळातील गरीबांच्या खात्यावर दरमहा थेट 6 हजार रूपयांची मदत पोहचवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचीही ग्वाही दिली आहे.
आपण जरी राजकारण करीत असलो तर वयाच्या 47 व्या वर्षी मीही बरेच घरकाम करते, मुलांची काळजी घेते, घराची साफसफाई करते, तसेच स्वयंपाकही करते. सगळ्याच गृहीणींना हे काम करावे लागते, पण इतकी सारी जबाबदारी पेलणाऱ्यांना गृहीणींना पुरेसा सन्मान मिळत नाही ही वस्तुस्थिती तुम्हाला अनुभवाला येत असेल. आमचे सरकार केरळात सत्तेवर आल्यानंतर येथे घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा दोन हजार रूपयांची मदत केली जाईल. तसेच कॉंग्रेसच्या न्याय योजनेची अंमलबजावणी या राज्यात करून येथील गरीबांना दरमहा सहा हजार रूपयांची मदत केली जाईल अशी ग्वाहींही त्यांनी दिली आहे.
गरीबांना दर वर्षी त्यांच्या बॅंक खात्यावर 72 हजार रूपये पोचवण्याचे आश्वासन कॉंग्रेसने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. त्या म्हणाल्या की निवडणुकीच्या राजकारणात घरकाम करणाऱ्या गृहीणींचा सन्मान राखण्याचे आश्वासन कॉंग्रेस पक्षाने दिले आहे. राजकारणात पहिल्यांदाच महिलांना असा सन्मान कॉंग्रेसकडून दिला जात आहे त्यामुळे तुम्हाला निश्चीतच आनंद मिळेल. तुमच्या समाधानातच सर्वांचे हित समावले आहे, त्यामुळे तुमच्या सन्मानासाठीही आम्ही कार्यरत राहु अशी ग्वाहींही त्यांनी यावेळी दिली.