पुणे – सध्या देशभरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्याचा प्रभाव बॉलिवूडवर झालेला दिसून येतोय. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यात आता करोनाची झळ मराठी चित्रपटसृष्टीवरही दिसू लागली आहे.
काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांची लाडकी जोडी उमेश कामत आणि प्रिया बापट यांना करोना झाल्याची बातमी समोर आली होती. त्यात आता मराठी संगीत दिग्दर्शक “सलील कुलकर्णी’ यांना सुद्धा करोनची लागण झाली आहे. स्वतः सलील यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत या बाबत माहिती दिली आहे.
https://www.facebook.com/musicdirectorsaleelkulkarni/posts/292723598877880
सलील आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी करोना टेस्ट पॉजिटीव्ह आली आहे. मी घरीच आयसोलेट करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार सुरू केले आहेत.
गेल्या एका आठवड्यात जे जे नागरिक मला भेटले त्यांना कल्पना असावी ह्या दृष्टीने ही पोस्ट मी करत आहे. असं ते म्हणाले.
सलील यांनी त्यांची सांगीतिक कारकिर्द वयाच्या तिसऱ्या वर्षी आकाशवाणी वरून केली. त्यांनी संगीताचे शिक्षण पं. गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडे घेतले. शिक्षणाने ते डॉक्टर असून संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांनी संगीतामध्ये बस्तान बसवले.
गेल्या दहा वर्षाच्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी अल्बमना संगीत दिले आहे. तसेच २००३ मध्ये संदीप खरे यांच्या बरोबर त्यांनी आयुष्यावर बोलू काही हा सांगीतिक कार्यक्रम सुरु केला त्याला अफाट प्रसिद्धी मिळाली. त्याचे ७०० च्या वर प्रयोग झाले आहेत.