मुंबई – कंगना रणावत आपल्या प्रत्येक सिनेमासाठी वेगळ्या प्रकारे मेहनत करत असते. “मणिकर्णिका’साठी तिने घोडेस्वारी शिकली. तर “पंगा’साठी कबड्डी शिकली. “थलायवी’साठी तिने वजन वाढवले आणि आता “तेजस’साठी ती चक्क 50 अंश तापमानामध्ये शूटिंग करते आहे.
“तेजस’चे शूटिंग सध्या राजस्थानात जैसलमेरमध्ये सुरू आहे आणि त्यामध्ये कंगना फायटर पायलटच्या रोलमध्ये दिसणार आहे. या शूटिंगच्या ठिकाणचा एक फोटो कंगनाने शेअर केला आहे. जैसलमेरमध्ये भट्टीसारख्या पेटलेल्या वातावरणात “तेजस’चे शूटिंग सुरू आहे.
“तेजस’विमानाशेजारी पायलट सूटमध्ये उभ्या असलेल्या स्वतःचाही फोटो कंगनाने शेअर केला आहे आणि 50 डिग्री सेल्सिअसमध्ये ऍक्शन अशी कॅप्शन दिली आहे. “इतक्या तापमानात काम करणे शक्य होणार नाही. असा मनात विचार येतो.
मात्र एक दिवस आपले रक्त यापेक्षाही तप्त आगीत मिसळणारच आहे.’ असा मौलिक विचारही कंगनाने व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे आणि तिच्या फॅन्सकडून या पोस्टला खूप लाईक मिळत आहेत.
“तेजस’ची गोष्ट सत्यकथेवर आधारित आहे. 2016 मध्ये हवाई दलात पहिल्यांदाच महिलांना पायलट म्हणून प्रवेश देण्याचा निर्णय झाला होता. त्याची कथा “तेजस’मध्ये दिसणार आहे.