कडक निर्बंध घालून ठरलेल्या परीक्षा वेळेतच घेण्याची मागणी
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा लॉकडाऊन जाहीर झाल्यास वेळेवर होतील का, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा उमेदवारांपुढे पडला आहे. लॉकडाऊन लागू करण्याऐवजी कडक निर्बंध घालून ही परीक्षा वेळेत घ्यायला हवी, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.
आयोगामार्फत दि. 14 मार्च रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा झाली. ही परीक्षा करोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता. मात्र, या उमेदवारांनी पुण्यासह राज्यभरात तीव्र आंदोलन केल्याने आयोगाला ही परीक्षा घ्यावी लागली.
त्यानंतरही आताही गेल्या आठवडाभरात दररोज 3 ते 4 हजार करोनाबधित रुग्ण पुण्यात आढळून येत आहेत. ही स्थिती कायम राहिल्यास स्पर्धा परीक्षेचे उमेदवार येत्या 11 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेविषयी साशंक आहेत. त्यामुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
उमेदवार संभ्रमात
लॉकडाऊन लागू करण्याविषयी राजकीय पक्षात एकवाक्यता नाही. लॉकडाऊन लागू होणार की नाही, याविषयी स्पर्धा परीक्षेचे उमेदवार संभ्रमात आहेत. एकूणच लॉकडाऊनविषयी काहीच स्पष्टता नसल्याने उमेदवारांची गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
आयोगापुढे मोठे आव्हान
यापूर्वी उमेदवारांनी केलेल्या तीव्र आंदोलनची धग पाहता येत्या 11 एप्रिलला होणारी परीक्षा वेळेत घेण्याविषयी आयोगापुढे मोठे आव्हान असेल. कारण या परीक्षेपूर्वी राज्यातील काही जिल्ह्यांत लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत लॉकडाऊन, तर काही ठिकाणी कडक निर्बंध असे चित्र आहे. अशा परिस्थितीत परीक्षा संपूर्ण राज्यभरात होतील का, याविषयी साशंकता आहे.