‘रसिक मायबाप’ कलेला प्रत्यक्ष दाद देतील का?
पुणे – करोना, “लॉकडाऊन’ आणि निर्बंध यांमुळे नव्याने भरारी घेणाऱ्या मनोरंजन क्षेत्राला अधिक फटका बसत आहे. सरकारने लॉकडाऊन जाहीर केला तर दुसरा पर्याय नाही, असे मत कलाकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या सगळ्यांत स्पष्टता नसल्याने मनोरंजन क्षेत्रातील आगामी नियोजनबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याचे कलाकार सांगतात.
मागील लॉकडाऊनमुळे नाट्य, चित्रपट आणि कलासृष्टी जवळपास नोव्हेंबरपर्यंत ठप्प होती. इतकेच नव्हे, तर नाट्यगृहांमध्ये 50 टक्के उपस्थितीसह अनेक बंधने होती. आता बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनबाबत चर्चा सुरू असल्याने, धास्ती वाढली आहे.
सध्याची जमावबंदी आणि आगामी काळात लॉकडाऊन लागल्यास “रसिक मायबाप’ कलेला प्रत्यक्ष उपस्थित राहून दाद देतील का, अशी चिंता या क्षेत्राला वाटत आहे.
प्रशासन म्हणते…
करोनाच्या पार्श्वभूमीवर नाटकांच्या प्रयोग संख्येवर बंधने आली आहेत. पालिकेच्या नाट्यगृहांत दररोज फक्त दोनच प्रयोगांचे नियोजन प्रशासनाने केले आहे. अण्णा भाऊ साठे सभागृह, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शनिवारी आणि रविवारी प्रयोग होत आहेत. नाटकांमधील मध्यंतराची वेळ कमी करुन दुपारी 12 ते 3.30 आणि सायंकाळी 5 ते 7.30 अशा दोनच प्रयोगांची आखणी केली आहे, असे महापालिकेचे नाट्यगृह व्यवस्थापक सुनिल मते यांनी दिली.
काही नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. अजूनही नागरिक विनामास्क वावरतात. लॉकडाऊनचे परिणाम सर्व क्षेत्रांसह नाट्य आणि चित्रपट विश्वालादेखील सहन करावे लागत आहेत. लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय शासनाचा असून, शासनाने लॉकडाऊन लावल्यास कोणताही पर्याय नाही.
– सुबोध भावे, अभिनेते
नाट्य आणि चित्रपट क्षेत्र अनेक महिन्यांनंतर पुन्हा उभे राहत आहे. यातच लॉकडाऊन लावल्यास प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. चित्रपटांच्या शुटिंगच्या जागा वेगळ्या असल्याने, शुटिंगला परवानगी मिळावी, अशी महामंडळाची मागणी आहे.
– मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्य परिषद आणि अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ
पुन्हा लॉकडाऊन म्हटल्यावर कलाकारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणतेही करमणुकीचे माध्यम प्रेक्षकांशिवाय पूर्ण होत नाही. परंतु, निर्बंधांबाबत पहिल्यांदाच याच क्षेत्रावर गदा येते. लॉकडाऊनच्या अनुषंगाने होणाऱ्या निर्णयांमुळे प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत साशंकता आहे. सध्याच्या निर्बंधांमुळे रात्रीचे प्रयोगदेखील रद्द आहेत. आदेशांमध्ये अधिक स्पष्टता नसल्याने आगामी प्रयोगांचे नियोजन आणि त्याअनुषंगाने पूर्वतयारी कठीण होत आहे.
– अपर्णा चोथे, अभिनेत्री आणि लेखिका