पुणे – स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित दुसऱ्या एस. बालन करंडक अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत किंग्ज स्पोर्टस क्लब आणि जीएसटी अँड कस्टम संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मुंढवा येथील लिजंड्स स्पोर्टस क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अथर्व काळे याच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर किंग्ज स्पोर्टस क्लब संघाने स्पायडर्स स्पोर्टस संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव केला आणि
स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पायडर्स स्पोर्टस संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 19.5 षटकांत 10 गडी गमावून 153 धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये राजवर्धन उंद्रे (41 धावा), अनिष गायकवाड (31), आनंद शहा (24) व चंद्रकांत ठाकूर (16) यांनी धावांचे योगदान देत संघाला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला.
किंग्ज स्पोर्टस क्लब संघाने या आव्हानाचा पाठलाग करताना भक्कम सुरुवात केली. सलामीवीर पवन शहा आणि अथर्व काळे यांनी 44 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी अथर्व आणि अजित गव्हाणे यांनी 54 चेंडूत 110 धावांची अभेद्य भागीदारी करत किंग्ज संघाला 17.1 षटकांत विजय मिळवून दिला. अथर्व काळे याने 33 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 88 धावा केल्या.
दुसऱ्या सामन्यात धीरज फटांगरेच्या नाबाद 69 धावांच्या स्फोटक खेळीमुळे जीएसटी अँड कस्टम संघाने पीआयओसी हरीकेन्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पीआयओसी हरीकेन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 152 धावा केल्या. यामध्ये ऋतुराज वीरकर याने नाबाद 51 धावांची खेळी केली. जीएसटी अँड कस्टम संघाने हे आव्हान 14.5 षटकांत व 3 गडी गमावून पूर्ण केले. यामध्ये धीरज फटांगरे याने नाबाद 69 धावा फटकावून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक –
स्पायडर्स स्पोर्टस : 19.5 षटकांत सर्व बाद 153 धावा. (राजवर्धन उंद्रे 41, अनिष गायकवाड 31, आनंद शहा 24, चंद्रकांत ठाकूर 16, पवन शहा 2-25, ऍलन रॉड्रीक्स 2-30) पराभूत वि. किंग्ज स्पोर्टस क्लब ः 17.1 षटकांत 1 बाद 154 धावा. (अथर्व काळे नाबाद 88, अजित गव्हाणे नाबाद 44, पवन शहा 21). सामनावीर : अथर्व काळे.
पीआयओसी हरीकेन्स : 20 षटकांत 6 गडी बाद 152 धावा. (ऋतुराज वीरकर नाबाद 51, सुदीप पाठक नाबाद 25, आदर्श बोथरा 20, महेश पाटील 1-29) पराभूत वि. जीएसटी अँड कस्टम संघ ः 14.5 षटकांत 3 बाद 153 धावा. (धीरज फटांगरे नाबाद 69, शुभम नागवडे 35, रोहन मारवाह 22, क्षितिज कबिर 2-33). सामनावीर ः धीरज फटांगरे.