पुणे – शहरात नवीन सक्रीय करोना बाधितांचा आकडा 22 हजारांवर पोहचला असतानाच; महापालिकेस दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या दीड महिन्यांत महापालिकेच्या 4 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून, एकाला दुसऱ्यांदा लागण झाली आहे. लसीकरण आणि मागील लाटेत अनेक कर्मचाऱ्यांच्या शरीरात तयार झालेल्या ऍन्टिबॉडिजमुळे हा आकडा कमी असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
महापालिकेचे कर्मचारी करोना नियंत्रणाच्या कामात फ्रंटलाइन वर्कर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मागील वर्षी मार्च ते डिसेंबर अखेरपर्यंत महापालिकेच्या जवळपास 669 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली होती.
त्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून पुन्हा शहरात नव्याने रूग्णवाढ सुरू झाली असून त्यात, नव्याने सुमारे 22 हजारांवर बाधित आढळले असून, त्यात महापालिकेचे पाच कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनाही सौम्य लक्षणे असून त्यातील काही घरीच उपचार घेत आहेत.
महिला कर्मचाऱ्यास दुसऱ्यांदा संसर्ग
महापालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्याला दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ही महिला करोना सर्वेक्षणाच्या कामात असताना तिला बाधा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाकडे कार्यरत असताना तिला पुन्हा संसर्ग झाला आहे. तिलादेखील सौम्य लक्षणे असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.