वॉशिंग्टन – अमर्यादपणे वाढत असलेल्या करोनाविषाणू अर्थात कोव्हिड19 मुळे मरण पावणाऱ्यांची संख्या सध्या अमेरिकेत सर्वोच्च असली, तरी साथ आटोक्यात येता-येता या देशाला आणखी एका मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे, आणि ती समस्य आहे, सर्वसामान्यांचे मानसिक स्वास्थ्य हरवण्याची! वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास, तिचे परिणाम करोनाच्या साथीपेक्षा भीषण असतील, असा अंदाज वर्तवला आहे. ज्या लोकांपर्यंत मी पोहोचू शकत नाही, अथवा ज्यांना ही मदत मिळणार नाही, अशी मोठी लोकसंख्या या उपचारापासून वंचित राहील अशी भीती आहे.
न्यूयॉर्कमध्ये आरोग्य सेवेशी निगडीत असलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांनीच आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या मानसिक अस्वास्थ्याच्या समस्येच्या गांभीर्याकडे तातडीने लक्ष देणे सरकारला भाग पडले आहे. या साथीविरूध्द लढणाऱ्या योद्ध्यांनी मानलेला हा पराभव आहे, असे अमेरिकेत मानले जात आहे. एकीकडे वाढणारी महामारीची साथ, स्वकीय-आप्तजनांच्या मृत्युच्या येत असलेल्या बातम्या, सामाजिक अलगीकरणाचा ताण आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेची भीती यामुळे अमेरिकेत मानसिक समस्यांची मोठी मालिकाच निर्माण होऊ शकते. त्यामुळे नैराश्यात वाढ होणे, अंमली पदार्थांच्या आहारी जाणे, दु:खद घटनांमुळे वाढणारा ताण याची परिणती आत्महत्येसारख्या घटनांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.
आर्थिक पुरवठ्यामध्ये झालेली मोठी घट आणि साथीच्या संकटाला सामोरे जाण्याचे मर्यादित प्रयत्न यामुळे देशात मनोरुग्णांची संख्या वाढू शकते, असे वॉशिंग्टन टाइम्सने म्हटले आहे. यासंदर्भात कैसर फॅमिली फौंडेशनमार्फत एक सर्वेक्षण करण्यात आले असून, करोनाच्या साथीमुळे आपले मानसिक स्वास्थ्य हरवल्याचे 50 टक्क्यांहून अधिक अमेरिकन नागरिकांनी सांगितल्याचे हा अहवाल सांगतो.
मध्यवर्ती आरोग्य यंत्रणेच्या हेल्पलाईनवरील तक्रारींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत, तब्बल एक हजार टक्के वाढ झाली असून, अत्यंत कमी कालखंडात या हेल्पलाईनवर 20 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी संपर्क साधला आहे. तसेच ऑनलाईन उपचार करणारी कंपनी टॉकस्पेसने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ग्राहकांत 65 टक्के वाढ फेब्रुवारीच्या मध्यापासून झाली आहे. मेसेजेस आणि ट्रानस्क्रीप्ट पद्धतीद्वारे उपचार करणाऱ्या या कंपनीच्या ग्राहकांतील वाढीमुळे या समस्येचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
खेदाची बाब म्हणजे, करोनाविषाणूच्या साथीविरोधात लढण्यासाठी अमेरिकन सरकारने अब्जावधी डॉलर्सचे आर्थिक पॅकेज जाहीर केले असले, तरी त्यातील एक टक्काही रक्कम मानसिक स्वास्थ्य व्यवस्थापनासाठी ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे सामाजिक वागणुकीसंदर्भात काम करत असलेल्या आरोग्य केंद्रांनी (कम्युनिटी बिहेव्हिरीयल हेल्थ सेंटर) आपल्या मोहिमा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिका मनोरुग्णांची जागतिक राजधानी बनल्यास नवल वाटायला नको.