करोनाबाधितांसाठी खासगी रुग्णालयात राखीव ठेवण्याच्या सूचना
पुणे – महापालिका रुग्णालयातील करोना राखीव बेड जवळपास फुल्ल झाले असून, आता खासगी रुग्णालयातील बेड राखीव ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या डॉ. नायडू, लायगुडे, बाणेर डेडिकेटेड रुग्णालय यासह अन्य राखीव रुग्णालयातील बहुतांश बेड भरले असून, आता खासगी रुग्णालयांना बेड राखीव ठेवण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.
बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे 31 मे 2021 पर्यंत खासगी रुग्णालयातील बेड महापालिकेला नियंत्रित करता येणार आहेत. त्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून, खासगी रुग्णालयांना यासंदर्भात पत्रही पाठवले आहे.
पुणे महापालिकेकडील तसेच ससून रुग्णालयासह शहरातील 8 सरकारी रुग्णालयांमधील 878 एकूण बेडपैकी केवळ 25 साधे बेड, 129 ऑक्सिजन बेड, 34 पैकी 1 आयसीयू बेड आणि 85 पैकी 33 व्हेंटिलेटर बेड शुक्रवारी रात्रीपर्यंत उपलब्ध होते, तर 66 खासगी रुग्णालयांमध्ये 2 हजार 820 बेड सद्य:स्थितीला उपलब्ध असून, यापैकी शुक्रवारी रात्रीपर्यंत 659 साधे बेड, 705 ऑक्सिजन बेड, 113 आयसीयू बेड आणि 102 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत.
ऍक्टिव्ह रुग्णसंख्या पाहता त्यातील ऑक्सिजनची गरज असलेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्या ऑक्सिजन बेड वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. महापालिकेकडे सध्या बेड उपलब्ध आहेत; मात्र खासगी रुग्णालयांनाही त्यांचे बेड तयार ठेवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक रुग्णालयांनी बेड राखीव ठेवण्याला सुरुवात केली आहे. अन्य काही रुग्णालयांना पत्र पाठवण्यात आले आहे.
– डॉ. मनिषा नाईक, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका