मुंबई – अमिताभ बच्चन यांनी फिल्मी दुनियेत जे अनन्यसाधारण योगदान दिले आहे, त्याची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे. बच्चन यांना यावर्षीच्या मानाच्या “एफआयएएफ’ पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. “इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काईव्हज’च्यावतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जात असतो.
हॉलिवूडचे प्रख्यात दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेस आणि ख्रिस्तोफर नोलान यांच्या हस्ते बच्चन यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या दोघांनीही बच्चन यांचे आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. सिनेमाचे संवर्धन करणे ही सिनेसृष्टीसाठी जगभराच्या पातळीवर खूप महत्वाची आहे.
भारतातील सिनेसृष्टीही त्याबाबत निरपवाद आहे. तब्बल पाच दशके सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या बच्चन यांनी सिनेजगतात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांनी केवळ भारतीयच नव्हे, तर संपूर्ण उपखंडात आपला ठसा उमटवला आहे.
सिनेमाच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेले य्गदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच या प्रसिद्ध पुरस्कारासाठी दुसऱ्या कोणाचीही निवड केली जाऊ शकत नव्हती, असे मार्टिन यांनी सांगितले. “गुलाबो सिताबो’ हा अमिताभ बच्चन यांचा सर्वात अलिकडचा सिनेमा होता. आता “चेहरे’, “ब्रह्मास्त्र’ आणि “मेडे’ हे त्यांचे आगामी सिनेमे असणार आहेत.