दुबई – भारतीय फिरकी गोलंदाजीचा कणा असलेल्या रविचंद्रन अश्विन आयसीसीच्या फेब्रुवारी महिन्याच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अष्टपैलू कामगिरी केल्याने त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली. इंग्लंडची टॅमी बेआऊमॉंट ही महिला विभागात या पुरस्काराची मानकरी ठरली.
भारतीय संघाने अश्विनच्या साथीत अक्सर पटेलच्या फिरकी माऱ्याने इंग्लंडला चितपट करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळविले. तिसऱ्या कसोटी सामन्यातील शतकी खेळी खेरीज अश्विनने फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध 24 गडी बाद केले. त्याच्या कामगिरीला या वेळी आव्हानच नव्हते.
क्रिकेट चाहत्यांच्या सर्वेक्षणात बहुतेक सर्वांनीच अश्विनला पसंती दिल्याचे आयसीसीने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट (333 धावा आणि 6 बळी), तसेच पदार्पणातच द्विशतकी खेळी करून विंडीजच्या विजयात मोलाची कामगिरी करणारा काईल मेयर्स यांचे अश्विनला आव्हान होते. इंग्लंडची टॅमी बेआऊमॉंट ही महिला विभागात या पुरस्काराची मानकरी ठरली.
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यात तिने तीन अर्धशतकी खेळी करताना एकूण 231 धावा केल्या. या महिन्याच्या पुरस्कारावरती प्रतिक्रिया देताना पुरस्कार समितीचे एक सदस्य इयान बिशप म्हणाले,’अनुकूल वातावरणाचा सुरेख उपयोग करून घेत अश्विनने जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या कामगिरीमुळे भारताला मालिकेत सातत्य दाखवता आले.
दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीतही त्याने परिपक्वता दाखवली. इंग्लंड वर्चस्व राखून पाहात असताना त्याने जबरदस्त शतकी खेळी करून त्यांना निराश केले. त्याचबरोबर महिला विभागातील बेआऊमॉंट हिची कामगिरीदेखील विलक्षण होती. तिच्या दोन अर्धशतकी खेळी संघाच्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या होत्या.