- जुगार अड्ड्यावर छापा
पिंपरी – वाकड पोलिसांनी पडवळनगर, थेरगाव येथे एका घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यात पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा देखील समावेश आहे.
प्रमोद प्रकाश पवार (रा. पडवळनगर, थेरगाव), मुरली ईश्वरदास येलवाणी (वय 65, रा. काळेवाडी), विनोद यशवंत मिरगणे (वय 38, रा. थेरगाव), शहाजी मधुकर पाटील (वय 48, रा. वाकड), समीर अकबर अत्तार (वय 36, रा. थेरगाव), बाळू जानराव (वय 35, रा. वाल्हेकरवाडी), विनोद जाधव (वय 30), राजस्थानी मारवाडी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रमोद पवार हा भाजप नगरसेविका मनीषा पवार यांचा पती आहे. मनीषा पवार या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती आहेत.
पडवळनगर, थेरगाव येथे राजस्थानी मारवाडी व्यक्तीच्या घरी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. 7) सायंकाळी पाच वाजता छापा मारला असता राजस्थानी मारवाडी व्यक्तीच्या घरात विनापरवाना, बेकायदेशीरपणे 13 पत्त्यांचा रम्मी नावाचा जुगार सुरु असल्याचे निदर्शनास आले. मास्क न वापरता एकत्र जमून करोना संसर्ग पसरविण्यास पोषक वातावरण निर्माण केले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.