नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उदय शेळके यांची आज बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदाची संधी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक असलेल्या माधवराव कानवडे यांना मिळाली आहे. बँकेच्या सहभागृहात आज दुपारी पदाधिकारी निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या सभेत या निवडी घोषित करण्यात आल्या.
अध्यक्षपदासाठी उदय शेळके यांना चंद्रशेखर घुले सूचक तर, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले अनुमोदक होते. माधवराव कानवडे यांना अरूण तनपुरे सूचक तर, भानुदास मुरकुटे अनुमोदक होतो. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी दिग्विजय आहेर यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, बँकेचे नूतन संचालक आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष उदय शेळके म्हणाले, ‘‘अत्यंत कमी वयात जिल्हा सहकारी बँकेचा अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला. त्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळसाहेब थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे आभार मानतो.
मंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री शंकरराव गडाख यांनी बँकेवर लक्ष ठेवावे. आम्ही चुकलो तर तत्काळ आम्हाला सांगावे. त्यातून आम्हाला चांगला कारभार करता येईल.’’ यावेळी मंत्री गडाख, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, सीताराम गायकर यांनी मनोगत व्यक्त केले.
राजकारणाविरहितच काम होईल : महसूलमंत्री थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘जिल्हा सहकारी बँकेला मोठी परंपरा आहे. राज्यात नावाजलेल्या नेत्यांनी या बँकेचे नेतृत्व केलेले आहे. आता बॅकिंगच्या समस्या वाढल्याने चकोरीत राहून काम करावे लागेल. बँक संभाळणे खूपच आव्हानत्मक काम आहे.
रिर्झव्ह बँकेचे खूप लक्ष आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत शिस्त पाळावीच लागेल. बँकेच्या मिटिंगचा वार चर्चा करून बदलण्यात येईल. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारणाविरहित काम झाले आहे. बँकेच्या 17 जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित चार जागा बिनविरोध झाल्या असत्या तर आम्हाला आणखी आनंद झाला असता.’’