शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणेंना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी

कोल्हापूर  – कर्नाटकातील कन्नड संघटनांकडून महानगरपालिकेसमोर लावण्यात आलेला लाल पिवळा ध्वज हटविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिकेवर दि.8 रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे येण्याची शक्‍यता असल्याने दि. 7 ते दि.9 पर्यंत त्यांना जिल्हा प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी आदेश जारी केला आहे.

कन्नड संघटना कडून महानगरपालिकेसमोर लाल पिवळा ध्वज लावून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बेकायदेशीररीत्या लावण्यात आलेला हा ध्वज हटविण्यात यावा. अन्यथा महानगरपालिकेसमोर भगवा ध्वज फडकवू असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. यासाठी रविवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.

यादरम्यान महाराष्ट्रातील शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्‍यता आहे. यामुळे भाषिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो यासाठी विजय देवणे यांच्यावर जिल्हा बंदी घालण्याची शिफारस पोलिस आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावरुन जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी त्यांच्यावर तीन दिवसापर्यंत जिल्हा प्रवेश बंदीचा आदेश जारी केला आहे. .

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.