पुणे – ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सोमवारी सुरूवात झाली. “कोविन ऍप’चा गोंधळ या टप्प्यातही झाल्याने अनेकांना लस न घेताच परत जावे लागले. परंतु ज्या ठिकाणी ऍप सुरू असलेल्या ठिकाणी अक्षरश: ज्येष्ठ नागरिकांची झुंबड उडाली. कमला नेहरू रुग्णालयात त्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते. लसीकरणानंतर ज्येष्ठांशी प्रभातने संवाद साधला.
पहिल्या लसीलाही त्रास झाला नाही. त्रास झाला तरी फायद्याचेच आहे. महिनाभर पाहिले कोणालाही त्रास झाला नाही. झाला तर त्याची यंत्रणाही खूप चांगली आहे. मी आणि पत्नी डॉ. भारती आम्ही हेल्थकेअर वर्कर्स आहोत. त्यामुळे आमचा हा दुसरा डोस. आईला लस द्यायचीच होती. पण, अन्य लसीही आपण आजपर्यंत घेतल्या आहेत. आला तर किरकोळ त्रास आला होता. लस दिल्यानंतरची मेसेजची सिस्टिमही खूप “प्रॉम्प्ट’ होती.
– डॉ. मोहन परांजपे, वय 69, सदाशिव पेठ
प्रत्येकानी लस घ्यायला पाहिजे. आपल्याला या लसीच्या माध्यमातून एवढी सुरक्षितता मिळत आहे. आज नव्वदाव्या वर्षीही मला असे वाटते, की मला करोना होऊ नये.
– मंगला परांजपे, वय 90, डॉ. मोहन यांची आई
करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोविन ऍपवर सुरुवातीला नोंदणी करताना अडचण आली. मात्र, पुन्हा ऍप डाऊनलोड केल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. ही पद्धत अत्यंत सोपी असून, सोयीने लसीकरण केंद्र, दिनांक आणि वेळ निवडता येते. आपण सर्वांनीच करोनाचा सामना केला आहे. आता लशीच्या रुपाने या साथरोगाला पायबंद घालण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस आवर्जून घ्यावेत.
– सतीश आणि स्नेहल देशपांडे, सहकारनगर
सुरुवातीला को-विन ऍप ओपन होत नव्हते परंतु आमच्या मुलीने आम्हांला सुरतहून ती साइट उघडून रजिस्ट्रेशन करून दिले. माझे वय 62 आहे आणि पत्नीचे 58 आहे. मी ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहे, तर पत्नी को-मॉर्बिड आहे. तिला मधुमेहाचा त्रास आहे. ती इन्शुलिनवर आहे. त्यामुळे आम्ही लस घेतली. येथे गर्दी होती, सकाळी आम्ही जेवण केले नव्हते, त्यामुळे आम्हांला काहीतरी खाऊन यायला सांगितले. आम्ही चहा-बिस्किटे खाऊन लस घेतली. लस घेणे आवश्यक आहे असे वाटले म्हणून लस घ्यायला आलो. आजपर्यंत सगळे “मिसगाईड’ करत होते. परंतु आता ती घ्यावी या विचारांप्रत आम्ही पोहोचलो आहोत आणि ती घेतली. करोना होण्यापेक्षा लस घेतलेले चांगले आहे.
– यतीन आणि वर्षा शाह, डेक्कन
आमच्या मुलाने आमचे रजिस्ट्रेशन केले आहे. सर्व ज्येष्ठांनी लस घेतलीच पाहिजे असे मला वाटते. भीती वाटण्यासारखे काहीच नाही. पूर्वी देवी वगैरेची लस घेत होतो तशीच ही असावी. ऑनलाइन रजिस्ट्रेशनमध्ये कोणतेच अडथळे आले नाहीत. केंद्रावर जी गर्दी झाली आहे, त्याची सिस्टिम बसवली पाहिजे. करोना काळात ऐवढी गर्दी आहे. त्याचे नियोजन होणे अत्यंत आवश्यक आहे.
– श्रीकृष्ण आणि राधिका नेने, सदाशिव पेठ
माझे वय 81 आणि पत्नीचे 75 आहे. मुलीने आमचे रजिस्ट्रेशन केले होते. सुरूवातीला मला भीती वाटली परंतु पत्नीला भीती वाटली नाही. असे असतानाही आम्ही लसीची वाट पहात होतो. आम्ही बाहेर एक तास वाट पाहिली. त्यानंतर आमचा नंबर लागला. आधी येथे लसीकरण सुरू आहे का ते पाहिले, त्यानंतर वर येऊन लस घेतली.
– ओमराज आणि सरोज मुदलीयार, कसबापेठ
माझे वय 46 असून, मला थॅलेसिमियाचा आजार आहे. मी कोविन पोर्टलवर लस घेण्यासाठी नोंदणी केली आणि कमला नेहरू रुग्णालयातील लसीकरण केंद्रात लस घेतली. केंद्रावर सुरुवातीला व्याधीग्रस्त नागरिकांची नोंदणी करताना अडचणी येत होत्या. मात्र, केंद्राच्या अधिकाऱ्यांनी या अडचणी दूर केल्या. व्याधीग्रस्तांनी कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी.
– जतीन सेजपाल, रास्तापेठ, सहव्याधी रुग्ण