समाविष्ट गावांतून मिळणाऱ्या महसुलाच्या भरवशावर पुणे महापालिकेची ‘उधळण’

महानगरपालिका अंदाजपत्रकातील प्रस्तावित योजना

पुणे – महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सादर करीत असताना नव्याने महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या 23 गावांतून महापालिकेस बांधकाम विकास शुल्क आणि मिळकतकरातून मोठे उत्पन्न मिळेल, असे आराखडे बांधत अंदाजपत्रक 8 हजार कोटी रुपयांच्यावर नेत विविध योजना आणि त्याकरिता कोट्यवधींच्या निधींची “उधळण’ करण्यात आली आहे. 2021-22च्या अंदाजपत्रकात जवळपास 80 पेक्षा अधिक योजना प्रस्तावित आहेत. मात्र, या गावांतून किती निधी येणार, याचे कोणतेही स्पष्टीकरण मांडण्यात आलेले नाही.

कॅन्सर हॉस्पिटल उभारणार
सर्वांसाठी वैद्यकीय सुविधा, महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय या वर्षी सुरू होणार आहे. या साठी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या महाविद्यालयासाठी अंदाजपत्रकात 146 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर कॅन्सर या आजारावर उपचार करणारे एकही स्वतंत्र रुग्णालय पुणे शहर किंवा पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये नाही. त्यासाठी महापालिकेच्या दहा हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर वारजे किंवा बाणेर येथे नानाजी देशमुख कॅन्सर रुग्णालय बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रियामध्ये मुख्यालय असणाऱ्या आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या “वामेड’ या संस्थेच्या सहकार्याने रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या शिवाय डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रात सुपर स्पेशालिटी युरॉलॉजी/युरो सर्जरी हॉस्पिटल, पालिकेच्या पाचही विभागांत अतिदक्षता विभाग, मुकुंदराव लेले दवाखाना अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.

मेट्रो मार्गाचा होणार विस्तार
डिसेंबर 2021 अखेर पर्यंत शहराच्या वर्षांचा वेध घेत पुणे शहराच्या चारही बाजूंना प्रत्येकी 50 किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका विस्तारित करण्यात येत आहेत. शिवसृष्टी ते रामवाडी, स्वारगेट ते निगडी, शिवाजीनगर ते हिंजवडी या तीन मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. तसेच यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावणे अपेक्षित आहे. सिंहगड रस्ता ते पुणे कॅन्टोन्मेंट, स्वारगेट ते कात्रज, शिवाजीनगर ते हडपसर, रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक, वारजे ते स्वारगेट अशा मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम नियोजित असून त्यासाठी अंदाजपत्रकात साडेतीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

तीन मतदारसंघात सीसीटीव्ही
गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, यासाठी कसबा विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवून ती मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडण्याची घोषणा गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात करण्यात आली होती. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. शिवाजीनगर आणि पर्वती या दोन विधानसभा मतदार संघांमध्ये या वर्षी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात 2 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

30 हजार एलईडी बल्ब
केंद्र शासनाच्या धोरणानुसार एलईडी दिवे बसविणे अंतर्गत (ईईएसएल) दोन वर्षांत मध्य पुण्यातील जुने नादुरुस्त दिवे बदलून 42 हजार एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. या वर्षी आणखी 30 हजार एलईडी दिवे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. समाविष्ट गावांतील प्रकाश व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्‍यक तरतूद करण्यात आली आहे. महापालिका शाळा, दवाखाने, स्मशानभूमी आदी ठिकाणी विद्युतविषयक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. वीज बिलामध्ये बचत करण्याच्या उद्देशाने एक्‍सप्रेशन ऑफ इंटरेस्टच्या माध्यमातून वीज खरेदीचे प्रस्ताव मागवण्यात येणार असून त्यासाठी 7 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे.

लोकोपयोगी योजना
केंद्र शासन, राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या विद्यार्थी, युवक, सुशिक्षित बेरोजगार, महिला, ज्येष्ठ नागरिक, अंध, दिव्यांग, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आदींसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवण्यात येतात. या योजनांची अधिकाधिक जनजागृती करून ती लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी योजनेचे स्वरूप, फायदे, पात्रता, आवश्‍यक प्रमाणपत्रे याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी पुस्तिका तयार करून तिचे वितरण करण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

“आरोग्य वर्धन प्रकल्प’…
पुणे शहरात विशेषतः वस्ती पातळीवर मोठ्या प्रमाणात आरोग्याचे गंभीर प्रश्‍न आहेत. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज असल्याची बाब प्रकर्षाने पुढे आली आहेत. त्या दृष्टीने “आरोग्य वर्धन प्रकल्प’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. कमला नेहरू रुग्णलायात “मधुकर बिडकर रक्तपेढी, आधुनिक तंत्रज्ञानाने हृदयरोग निदान सुविधा, स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी हृदयरोग चिकित्सा सुविधा (बालकांसाठी), महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणीसाठी आरोग्य तपासणी कार्यक्रम नवीन कार्डिऍक ऍम्ब्युलन्स खरेदी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या पुणे शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये मानसशास्त्राचे सुसज्ज विभाग आहेत. त्यांच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने मानसिक रुग्णांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

रोजगारासाठी प्रयत्न
स्टार्ट अप, कौशल्य विकास, मुद्रा, पंतप्रधान रोजगार योजना आदी योजना सुशिक्षित बेरोजगार आणि उद्योजकांसाठी उपयुक्त ठरत आहेत. या योजनांबद्दल अधिक जनजागृती करण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रचार आणि प्रसाराचे कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार शहराच्या विविध भागांमध्ये मेळावे, व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा अशा मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी 2 कोटींचा निधी प्रस्तावित असून याद्वारे शहरांतर्गत रोजगारवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.