पिंपरी – पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाचा जुनाच “स्ट्रेन’ आहे. नवीन “स्ट्रेन’ सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाऊ नये. मात्र, करोनाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घ्यावी, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी केले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील सांस्कृतिक कार्यक्रमात कोविडबाबत दक्षता घेण्याकडे करण्यात आलेले दुर्लक्ष लक्षात घेता आयोजकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मास्क न लावल्याबद्दल 10 जणांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरामध्ये 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्येष्ठांच्या विविध संघटनांसमवेत चर्चा केली आहे. तसेच, विविध सोसायट्यांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसमवेत देखील चर्चा झाली आहे.
ज्येष्ठांची नोंदणी केली जात असून 1 तारखेपासून त्यांचे लसीकरण सुरू करण्यात येईल. सोसायट्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांबाबत आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जगात सुरूवातीला ब्रिटनमध्ये करोनाचा नवीन “स्ट्रेन’ सापडला होता. त्यानंतर जपान, दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील नवनवीन स्ट्रेन सापडू लागले होते.
त्याशिवाय, महाराष्ट्रात आणि केरळमध्ये सापडलेला नवीन “स्ट्रेन’ जास्त धोकादायक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप तरी करोनाचा नवा “स्ट्रेन’ सापडला नसल्याने ही बाब दिलासादायक आहे.