सातारा : सामाजिक कार्यकर्ता सुधीर किसन देसाई (वय 47, रा. पुनवडी, ता. सातारा) यांच्यावर राजवाडा परिसरात मंगळवारी दोन अनोळखी युवकांनी कोयत्याने हल्ला केला. त्यामध्ये देसाई हे जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे राजवाडा परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुधीर देसाई हे कामासाठी मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास राजवाडा परिसरात कामासाठी आले होते. तेथे दोन अनोळखी युवकांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केला. याबाबतची माहिती मिळाल्यावर नातेवाइकांनी देसाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पायावर कोयत्याचे वार झाले आहेत.
त्यातील एक जखम गंभीर आहे. पुनवडी येथे शेतामध्ये गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन केले जात असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यातून हा हल्ला झाल्याचा संशय देसाई यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा रुग्णालयातील पोलीस कक्षातील पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदविण्यात येत होता. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.