नवी दिल्ली – हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्यावेळी अटक करण्यात आलेले केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पान यांना सर्वोच्च न्यायालयाने 5 दिवसांचा जामीन मंजूर केला आहे. आजारी आईला भेटण्यासाठी त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मात्र या दरम्यान प्रसिद्धी माध्यमांबरोबर संवाद साधता येणार नाही आणि सोशल मीडियाचा वापरही करता येणार नाही, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सांगितले. आईवर उपचार करत असलेले डॉक्टर आणि नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य कोणालाही कप्पान भेटू शकणार नाहीत. उत्तर प्रदेशचे पोलीस कप्पान यांना केरळला घेउन जातील आणि केरळचे पोलीस त्यांना सहकार्य करतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडीत मुलीच्या घरी जात असताना कप्पान यांना गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर रोजी अटक झाली होती. उपचारादरम्यान मरण पावलेल्या या पीडीत मुलीवर अधिकाऱ्यांनी पालकांच्या परवानगीशिवाय अंत्यसंस्कार उरकले होते. त्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले होते. त्या दरम्यान मथुरेतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित असलेल्या चारजणांना पोलिसांनी अटक केली होती.