चेन्नई – इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामन्यात सुरुवातीला रोहित शर्माचे दीडशतक आणि त्यानंतर रविचंद्रन अश्विनच्या पाच विकेटच्या बळावर भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने इंग्लंडवर 249 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात केली असून दिवसाअखेर भारताने एक विकेट गमावून 54 धावा केल्या आहेत.
दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 329 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने इंग्लंडला 134 धावांवर ऑल आउट केले. आर. अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावत 5 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे दिवसभरात तब्बल 15 विकेट पडल्या.
या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताकडून दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीसाठी उतरले. या दोघांनीही भारताच्या दुसऱ्या डावाची शानदार सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना दोघांनी 11 षटकांच्या आत भारताला 40 धावांचा टप्पा पार करुन दिला. मात्र, या दोघांची जोडी खेळपट्टीवर स्थिरावत असतानाच 12व्या षटकात जॅक लीचने शुबमन गिलला पायचीत केले. भारताने 12 षटकात 1 बाद 46 धावा केल्या आहेत. सध्या रोहित 42 चेंडूत 21 धावांवर आणि पुजारा 2 चेंडूत 3 धावांवर नाबाद खेळत आहे.
इंग्लंड संघाला पहिल्या डावात 59.5 षटकात सर्वबाद 134 धावा करता आल्या. त्यामुळे भारताला 195 धावांची आघाडी मिळाली आहे. इंग्लंडकडून यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्सने सर्वाधिक नाबाद 42 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ ऑली पोपने 22 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही इंग्लंडच्या खेळाडूला 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही.
भारतीय गोलंदाजांनी पहिल्या 11 षटकातच 23 धावांवर इंग्लंडचे 3 फलंदाज बाद केले. त्यातही इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट स्वस्तात पव्हेलियनला परतला. भारताचा पदार्पणवीर अक्षर पटेलने डावातील 10.3 षटकात आर. अश्विनच्या हातून रुटला झेलबाद केले. यासह रुट अक्षरचा कसोटी कारकिर्दीतील पहिला बळी ठरला. इंग्लंडच्या पहिल्या डावात रुट 12 चेंडूत अवघ्या 6 धावा करु शकला.
तत्पूर्वी भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने डावातील तिसऱ्याच चेंडूवर रॉरी बर्न्सला शून्यावर पायचित केले. त्यानंतर सलामीवीर डोमिनिक सिब्ली आर- अश्विनची शिकार बनला. 25 चेंडूत 16 धावांवर विराट कोहलीच्या हाती सोपा झेल देत सिब्ली बाद झाला.
दुसऱ्या सत्राखेरपर्यंत 8 विकेट्स गमावल्यानंतर बेन फोक्सने जॅक लीचला साथीला घेतले होते. या दोघांनी मिळून इंग्लंडला फॉलोऑन मिळण्यापासून वाचवले. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि इशांत शर्माने प्रत्येकी 2 विकेट्स आणि मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक :
भारत – पहिला डाव 95.5 षटकात सर्वबाद 329 (रोहित शर्मा 161, चेतेश्वर पुजारा 21, अजिंक्य रहाणे 67, षभ पंत नाबाद 58, अक्षर पटेल 5. जॅक लिच 78-2, मोईन अली 128-4, ज्यो रुट 23-1)
इंग्लंड – पहिला डाव 59.5 षटकात सर्वबाद 134 (डॉमनिक सिबली 16, बेन स्टोक्स 18, ऑलिव्हर पोप 22, बेन फोक्स नाबाद 42, ज्यो रुट 6. इशांत शर्मा 22-2, आर. अश्विन 43-5, अक्षर पटेल 40-2, महंमद सिराज 5-1)
भारत – दुसरा डाव 18 षटकात 1 बाद 54 (रोहित शर्मा नाबाद 25, शुबमन गिल 14, चेतेश्वर पुजारा नाबाद 7. जॅक लीच 19-1)