नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईनं मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा जगातला पहिला अरब देश होण्याचा मान मिळवला आहे. होप प्रोब (hope probe) असे या देशाच्या मंगळ मोहिमेचे नाव आहे. दरम्यान, युएईच्या कामगिरीवर संपूर्ण जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
होप या यानाने संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमाण वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 7. 42 वाजता पृथ्वीकडे सिग्नल पाठवले. यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्यात यश मिळवले. हे सिग्नल्स मिळताच दुबईच्या मोहम्मद बिन रशीद अवकाश केंद्रावर मोठा जल्लोष करण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, हे यान यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याची शक्यता 50% होती. दुबईचे शासक मोहम्मद बिन राशिद बिन मखतूम आणि अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद यांनी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.
تمت المهمة بنجاح
Mission Accomplished #العرب_إلى_المريخ pic.twitter.com/BxPQiJM0Sq
— HH Sheikh Mohammed (@HHShkMohd) February 9, 2021
तब्बल सहा वर्षांच्या अथक मेहनतीनंतर 200 मिलियन डॉलर्स खर्चून उभी केलेली ही मोहिम यशस्वी झाली. युएईचे हे यान 1,20,000 किलोमीटर प्रती तास या वेगाने कार्यरत आहे. मंगळाच्या गुरुत्वाकर्षण बलाशी समन्वय साधता यावा यासाठी युएईच्या वैज्ञानिकांनी अवकाश यानाचं इंजिन जवळपास 27 मिनिट सुरू ठेवले. युएईचे होप यान पुढचे काही महिने मंगळ ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करेल. युएईच्या या मोहिमेचा अजून एक हेतू म्हणजे मंगळ ग्रहाचा पहिला ग्लोबल मॅप तयार करणे.
हे यान तयार करताना वैज्ञानिकांना सर्वाधिक धोका वाटत होता तो त्याच्या वेगाचा. त्यांना काळजी होती, की जर अवकाशयान अधिक वेगाने गेले तर ते मंगळ ग्रहापासून दूर निघून जाईल आणि हळू गेले तर ते मंगळ ग्रहावर नष्ट होऊन जाईल. मात्र युएईच्या वैज्ञानिकांनी या सगळ्यावर नियंत्रण मिळवत अवकाशमोहीम यशस्वी केली.
वैज्ञानिक मानतात, की युएईसह अमेरिका आणि चीनचं यानही मंगळावर पोहोचणे हे जगात याबाबत वाढलेल्या स्पर्धेचे निदर्शक आहे. जगातले महाशक्ती असलेले देश आपलं वर्चस्व आणि दबदबा यामाध्यमातून सिद्ध करू पाहत आहेत. केवळ अमेरिका हाच जगातील एकमेव देश आहे जो आजवर मंगळाच्या पृष्ठभागावर यान उतरवण्यात यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनं आजवर तब्बल आठवेळा ही कामगिरी केली आहे.