संस्थेची कराची रक्कमही कमी होणार
पिंपरी – ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या पिंपरी चिंचवड येथील संस्थेला पाठवलेली करवसुलीबाबतची नोटीस स्थगित करण्यात आली आहे. सोबतच कराची रक्कमही कमी होणार आहे. गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला मालमत्ता प्रकरणी आलेल्या नोटीस प्रकरणी आज मुंबई येथे विधानभवनात बैठक पार पडली.
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ही बैठक बोलवली होती. या बैठकीला गिरीश प्रभुणे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, तसेच जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांना नुकतेच केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तर दुसऱ्याच दिवशी पारधी समाजासाठी उभ्या केलेल्या गुरुकुलम आणि परिसराचा 1 कोटी 86 लाखाचा कर थकल्याने महापालिकेने त्यांना जप्तीची नोटीस बजावली होती. त्यामुळे एका हातात सन्मान आणि दुसऱ्या हातात जप्तीची नोटीस अशा परिस्थितीला गिरीश प्रभुणे यांना सामोरे जावे लागले होते.
या प्रकरणी तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत या नोटीसला स्थगिती देण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांमध्ये याबाबत प्रशासन सखोल माहिती घेऊन कार्यवाही करणार आहे.
नीलम गोऱ्हे यांनी तातडीने आमच्याशी संपर्क केला. आजच्या बैठकीत ज्या सूचना केल्या आहेत त्यामुळे पुढल्या महिन्याभरात हा प्रश्न योग्य पद्धतीने सुटेल. दोन्ही शाळांचा 3 ते 3.5 कोटी कर होता, तो आता 5 ते 10 टक्क्यांवर येईल, तो आम्ही काही मुदतीत भरु. यातून काही उत्पन्न येत नाही, देणगी गोळा करुन हा कर भरावा लागेल. आम्ही समाधानी आहोत जी समस्या होती ती दूर होईल.
– गिरीश प्रभुणे
त्यांचे बांधकाम पुलामुळे बाधित झाले आहे. पुलाच्या कामामध्ये त्यांची शाळा गेली आहे. त्याबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाला कळविले नसल्याने तो कर कमी झाला नव्हता. त्यामुळे संपूर्ण कराची रक्कम एवढी मोठी होती. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली आहे, त्यामुळे तेवढा कर कमी होणार आहे.
– स्मिता झगडे, उपायुक्त, पिं.चिं. महापालिका