लखनऊ – उत्तर प्रेदशातील वाराणसी-लखनऊ राष्ट्रीय महामार्गावर अंत्यसंस्काराहून परतणाऱ्या बोलेरो जीपची ट्रकला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात जलालपूर येथील लहंगपूर गावाजवळ मंगळावरी पहाटे 3.30 वाजता झाला असून अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर वाराणसी येथील जिल्हा रूग्णालयात उपसार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सरायख्वाजा येथील जलालपुर गांवातील धनदेई देवी यांचे रविवारी निधन झाले होते. खजुरा गाव येथील त्यांचे जावई लक्ष्मीशंकर हे गावातील लोकांसोबत अंत्यसंस्कारासाठी वाराणसी येथे गेले होते.
अंत्यसंस्काराहून परतत असताना जौनपुर-वाराणसी सीमेवर लहंगपुर गावाजवळ पहाटे साडेतीन वाजता विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला बोलेरो पीकअपची जोरदार धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की, यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रूग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला. इतर 10 जखमींपैकी सहा जण गंभीर जखमी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच फूलपुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जखमींना जौनपूर आणि वाराणसी येथील जिल्हा रूग्णालयात उपसारासाठी दाखल करण्यात आले आहे.