मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट केले आणि त्यानंतर देशभराचत ट्विटर युद्ध पाहायला मिळालं. रेहानाच्या ट्विटनंतर खेळाडू, बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत, भारताला विभागण्याचा प्रयत्न होत असून, तसे होऊ देऊ नका असं आवाहन सेलिब्रेटींनी केले होते. या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्याचवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेलिब्रेटींवर कडाडून टीका केली होती. त्याला भाजपकडून आज प्रत्युत्तर देण्यात आले.
“सेलिब्रिटींना मेंदू नाही का हा प्रश्न फक्त देशाचा आवाज बुलंद करणाऱ्यांबाबत पडतो का ? रिहानाचे समर्थन करताना हा प्रश्न का पडला नाही? तेव्हा तुमचा मेंदू सिल्व्हर ओकवर गहाण होता का संजय राऊत ?,” असं म्हणत भाजपनेते अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
तत्पूर्वी “सेलिब्रिटींना मेंदू नसतो का ? तुम्हाला सेलिब्रिटी रस्त्यावरच्या याच लोकांनी केलं ना ?, या गरीबांना जे समजतं ते तुम्हाला का समजत नाही ?, तुम्हाला कोण वापरून घेतंय हे समजत नाही का? सवाल संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर भातखळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.