नवी दिल्ली – दिल्ली वगळता संपूर्ण देशभर उद्या “चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांनी दिला.
गाझीपूर सीमेवर पत्रकाराशी बोलताना टिकैत म्हणाले, हे चक्का जाम आंदोलन करणाऱ्यांसाठी शेतकरी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करतील. हे आंदोलन तीन तास चालेल. हे आंदोलन आम्ही दिल्लीत करणार नाही. मात्र, दिल्लीच्या बाहेर सर्वत्र हे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना अन्न पाणी देण्यात येईल. आमच्या बरोबर सरकार काय करत आहे, ते आम्ही जनतेला सांगू.
गाझीपूर सीमेबाहेर बॅरिकेडजवळ खिळे ठोकले आहेत त्याबाबत प्रतिक्रिया विचारता टिकैत म्हणाले, आम्ही पीके जोपासतो आणि ते खिळ्यांची पेरणी करतात.
हॉलिवूडच्या पीाठंब्यात काही गैर नाही
हॉलीवूड अभिनेत्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्याने कोणतीही हानी नाही. त्यात काहीही गैर नाही. मी त्यांना व्यक्तीश: ओळखत नाही, पण त्यांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय हा पाठींबा दिला आहे, असे टिकैत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.