पुणे – मित्राला दमदाटी केल्याचा जाब विचारल्याने चाकुने गाल, बरगडीखाली आणि पोटावर सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
व्यक्यां ऊर्फ विनोद सोमय्या चिमुला (वय 25, रा. कोंढवा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. तर, पोलिसांनी संतोष धोंडीराम टेमगिरे आणि प्रवीण सोनबा थोरात या दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबत नवनाथ गजाप्पा बिराजदार (वय 21, रा. येवलेवाडी, ता. हवेली) याने फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कर्मचारी अंकुश केंगले आणि संतोष आंगणे यांनी मदत केली. 9 जून 2015 रोजी रात्री 11.15 च्या सुमारास कोंढवा लेप्रसी रुग्णालयच्या पाठीमागे अंतुलेनगर वसाहतीजवळील मोकळ्या जागेत हा प्रकार घडला.
फिर्यादी व त्याचे चार मित्र पार्टी करत बसले होते. तर, चिमुला, टेमगिरे, थोरात आणि त्यांचा एक अल्पवयीन मित्रही त्याचवेळी पार्टी करत होते. फिर्यादींची पार्टी संपल्यानंतर त्यांच्या एका मित्राने दुसऱ्या मित्राला फोन करून बोलावून घेतले. त्यावेळी त्याला फिर्यादी आणि मित्र सापडेला. याबाबत त्याने चिमुला आणि त्याच्या मित्राकडे विचारणा केली. त्यावेळी त्या मित्राला शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली.
नंतर याबाबत विचारणा करण्यासासाठी फिर्यादी आणि त्याचे मित्र गेले. त्यावेळी चिमुला याने फिर्यादींवर चाकुने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली.