पुणे – प्रत्यक्ष लसीकरण करण्यात कोणताच अडथळा नाही. परंतु “को-विन ऍप’ बंद पडत असल्यामुळे, लसीकरण प्रक्रिया वेगाने होत नसल्याचे दिसून आले आहे. परंतु ही बाब केंद्र सरकारला कळवली असून, समस्या दूर केली जाईल, असे त्यांनी सांगितल्याचे राज्य लसीकरण प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.
करोना रोखण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण ही प्रक्रिया अवघड नाही. परंतु प्रत्येक लाभार्थींची माहिती “को-विन ऍप’मध्ये आहे. त्यातील लिस्टनुसारच त्यांना लसीकरणासाठी बोलवावे लागत आहे. यादीतून लाभार्थी सर्च करून त्यांना कळवण्याच्या प्रक्रियेत ऍपचे सतत बंद पडणे यामुळे लसीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. या सगळ्या समस्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत, असे डॉ. पाटील म्हणाले. त्यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. ही सर्व व्यवस्था सुरळीत होण्याला काही कालावधी जाईल. मात्र लसीकरणाचा हा पहिला टप्पा आम्ही वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली.
को-विन ऍपमुळे अडचणी काय?
– लाभार्थींना उशिरा मेसेज मिळाले आणि त्यामुळे ते लसीकरणासाठी आले नाहीत.
– एखाद्या लाभार्थीचे लसीकरण झाले परंतु ऍपमध्ये ते अपडेट झाले नाही, त्यामुळे त्या लाभार्थीचे नाव लिस्टमध्ये पुन्हा आले. एका लाभार्थीचे नाव तीन वेळा यादीत दिसते.
– लस घेतली नसली तरी आभाराचे मेसेज जात आहेत.
– एखाद्या लाभार्थीला चुकून मेसेज गेल्यास आणि त्याने यापूर्वी लस घेतलेली नसल्यास त्याला भविष्यात लस दिली जाणार का, यावर उत्तर मिळालेले नाही.
आज लसीकरण होणार नाही
मंगळवार, बुधवारी लसीकरण कार्यक्रम झाल्यानंतर गुरुवारी तो होणार नाही. त्यानंतर शुक्रवार आणि शनिवारी पुन्हा लसीकरण प्रोग्राम होणार आहे. या दोन दिवसांतील लाभार्थींचेही मेसेज गुरुवारी सायंकाळी पाठवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातर्फे कळवण्यात आले आहे.