गुरुवारवगळता 4 दिवस महापालिका हद्दीत मोहीम
पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार असून, गुरूवारवगळता चार दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. महापालिकेतील प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सोमवारी ही माहिती दिली. मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार, शनिवार अशी चार दिवस ही मोहीम असेल.
करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 16 जानेवारी रोजी झाला; मात्र त्यानंतर तो दोन दिवस स्थगित करण्यात आला होता. मात्र ही मोहीम मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असून, महापालिका क्षेत्रामध्ये नियोजित आठ ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे आठ केंद्रांवर आठशे लाभार्थींना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याप्रमाणे सायंकाळपर्यंत लाभार्थींना मेसेज केले जाणार असून, त्यांना वेळही कळवली जाणार आहे. संपूर्ण राज्यातही याच दिवशी मोहीम राबवली जाणार असून, तशा सूचना सर्व जिल्हे, स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्याचे राज्य आरोग्य विभागाने सांगितले.
को-विन ऍपचा गोंधळ
लाभार्थींची यादी आणि लस घेतल्यानंतर त्याचे अपडेट ज्या “कोविन’ ऍप वर टाकले जातात, ते ऍपच काही ठिकाणी बंद पडले. त्यामुळे अनेक ठिकाणी नावे अपडेट करण्याला, तसेच मुळात लाभार्थींची नावे समजून, त्यांना कळवण्याला उशीर झाला. काही ठिकाणी तर शुभारंभादिवशी ज्यांची नावे लिस्टमध्ये होती, त्यांना सोडून ज्या त्या ठिकाणी दवाखाने, रुग्णालयांतील हेल्थकेअर वर्कर्सना आणून लस देण्यात आली. ते लाभार्थी आहेत; परंतु त्यांचा नंबर नंतर कधीतरी पुढे होता; परंतु त्यांना पहिल्याच दिवशी लस टोचण्यात आली. पुण्यातही आठ केंद्रांपैकी तीन केंद्रांवरील ऍपचा गोंधळ झाला.
“सर्च’ आणि “ड्रॉप डाऊन’च्या समस्येला सामोरे जावे लागले. याविषयीची तक्रार राज्यामार्फत केंद्र सरकारच्या तांत्रिक विभागाकडे गेली असून, त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.