पुणे – राज्य सीईटी सेलने तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक सोमवारी प्रसिद्ध केले. यानुसार दि.21 जानेवारीपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एम.सी.ए. आणि एम.टेक. आदी अभ्यासक्रमांसाठी हे वेळापत्रक लागू राहणार आहे.
पहिल्या फेरीत जाहीर झालेल्या जागेवरील प्रवेश आता 20 जानेवारी रोजी दुपारी तीनपर्यंत विद्यार्थी त्यांच्या लॉग-इनमधून मान्य करू शकतील किंवा स्वीकारू शकतील. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून विद्यार्थ्यांना 20 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येईल.
21 जानेवारी रोजी दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील प्रसिद्ध होईल. दि.21 ते 23 जानेवारीदरम्यान विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी पसंतिक्रम नोंदवता येतील. 25 जानेवारी रोजी दुसऱ्या फेरीचे प्रवेश जाहीर होतील. 26 ते 30 जानेवारी (दुपारी तीनपर्यंत) विद्यार्थ्यांना आपल्या लॉग-इनमधून प्रवेश मान्य करता येईल.
दि. 27 ते 30 जानेवारी (सायंकाळी पाचपर्यंत) विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेत शुल्क भरून व कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित करता येईल. 21 जानेवारीपासून सर्व कॉलेजेस सुरू होतील. या प्रवेशप्रक्रियेसाठी दि.5 फेब्रुवारी ही अंतिम तारीख असेल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.