मेलबर्न –यंदाच्या मोसमातील पहिल्या ग्रॅड स्लॅम टूर्नामेंट ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा करोनामुळे पुन्हा अडचणीत आली आहे. ही स्पर्धा सुरू होण्याच्या 22 दिवस अगोदर खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना मेलबर्न येथे घेऊन येणाऱ्या दोन चार्टर्ड प्लेनमध्ये 3 करोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे ऑस्ट्रेलिया ओपनबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
या प्रकारानंतर बेलारूसची आघाडीची टेनिसपटू व्हिक्टोरिया अजारेंकासह 47 खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांना आता 14 दिवसांसाठी हॉटेलमधून बाहेर पडण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
याबाबत स्पर्धेचे डायरेक्टर क्रेग टिले म्हणाले, लॉस एंजिलिस येथून आलेल्या चार्टर्ड विमानामध्ये 3 करोना संक्रमित व्यक्ती आढळून आल्या आहेत. या विमानात एकूण 79 प्रवासी होते. यात 12 क्रू मेंबर्स आणि 67 प्रवासी होते. ज्यात 24 खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.