इंडोनेशियातील भूकंपातील बळींची संख्या वाढली

मामूजू – इंडोनेशियामध्ये झालेल्या भूकंपात बळी पडणाऱ्यांची संख्या 73 वर पोहोचली आहे. लष्करी इंजिनीयरनी भूकंपात उद्‌ध्वस्त झालेले रस्ते पुन्हा मोकळे केले आहेत. तसेच ढासळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली आणखीन मृतदेह आढळले असल्याने मृतांचा आकडा वाढला आहे.

सुलावेसी बेटावर माजेने जिल्ह्यामध्ये अवजड यंत्रसामग्री पोहोचवली गेली असून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या प्रवक्‍त्या रादित्या जाती यांनी सांगितले.

या भूकंपात दूरध्वनी यंत्रणा पूर्णपणे उध्वस्त झाली असून ती सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भूकंपात हजारो जण बेघर झाले असून 800 जण जखमी आहेत. तब्बल 27 हजार जणांना सुरक्षित आश्रय छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. या आश्रम छावण्यांमध्ये अन्न, ब्लॅंकेट आणि औषधांचा पुरवठा देण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम आहे सुरू आहे.

मामूजूतील लोकसंख्या 3 लाख इतकी आहे. येथील बहुतांश इमारती भूकंपात जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच जवळच्या डोंगरावरून भूस्खलन झाल्याने वाहतुकीचा पूलही बंद आहे. या पुलाच्या फेरनिर्मितीचे कामही सुरू करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.