मुंबई – महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेतही आता वादाची नवी मालिका सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाण्याच्या देवराम भोईर यांच्या उपाध्यक्षपदाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संघटनेच्या कार्यकारिणी सभेला ते उपाध्यक्ष की आजीव सदस्य म्हणून उपस्थित होते, असा प्रश्न आता विचारला
जात आहे.
ठाण्याचे प्रतिनिधी असलेल्या भोईर यांच्याबाबत ऑगस्ट महिन्यात ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेने कार्यकारिणी बदल केल्याचा खुलासा धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. त्यात भोईर यांचे उपाध्यक्षपद संपुष्टात आले असल्याचेही सांगण्यात आले होते.
मात्र, प्रत्यक्षात संघटनेने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अहवालात भोईर यांचे पदासह छायाचित्र प्रकाशित केले होते. तसेच ते सभेलादेखील उपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांचे पद कायम आहे का, मुदत संपुष्टात आली आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून संघटनेतील असेच काही वाद सातत्याने चर्चिले जात आहेत. येत्या काही दिवसांत संघटनेला या सगळ्याबाबत जाहीर खुलासा करावा लागणार आहे.