नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. विशेषत: पंजाब आणि हरियाणातील शेतकरी त्या विरोधात प्रचंड आक्रमक झालेले आहेत. त्याचा तडाखा काही दिवासंपूर्वीच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना बसला. कायद्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या एका कार्यक्रमात कायद्याला विरोध करणाऱ्यांनी तोडफोड केली होती.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर कायद्याचे समर्थन करणारे कार्यक्रम सध्या घेतले जाउ नयेत अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियाणा सरकारला व तेथील नेत्यांना केली आहे. राज्यातील मंत्री कंवर पाल गुर्जर यांनीच बुधवारी पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी करनालजवळ एका गावात मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉप्टर जेथे उतरणार होते, ते हेलीपॅडच अगोदर खोदून ठेवण्यात आले होते. त्या घटनेमुळे मुख्यमंत्री खट्टर यांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. भविष्यात अशा घटना पुन्हा होउ नयेत आणि कायद्यांच्या विरोधाची धार किती तिव्र आहे हे जगजाहीर होउ नये म्हणून असले कार्यक्रम केले जाउ नयेत असे शहा यांच्याकडून सांगण्यात आले असावे, असे भाष्ट जाणकारांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी निदर्शकांनी प्रचंड धुडगूस घातला होता. त्यांनी व्यासपीठावरच तोडफोड केली होती. झाला प्रकार पाहून मुख्यमंत्र्यांना कार्यक्रम रद्द करावा लागला. याचे व्हिडीओ फुटेजही मंत्री गुर्जर यांनी यावेळी पत्रकारांना दाखवले.