हडपसर- रामटेकडी येथील कचरा प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त कचरा आणला जातो आहे. ओपन डंपिंगमुळे पालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होत आहे. परिसरात भीषण प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने हडपसरकरांची फसवणूक थांबवावी, अन्यथा पालिका अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करावे लागेल, असा इशारा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिला आहे.
रामटकेडील कचरा प्रकल्पाची पाहणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. यावेळी त्यांनी सदर इशारा दिला. यावेळी आमदार चेतन तुपे, नगरसेवक योगेश ससाणे, अशोक कांबळे, नगरसेविका वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक सुनिल बनकर तसेच औद्योगिक वसाहतीतील सोसायटी धारक उपस्थित होते.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पावर महानगरपालिका मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहे. प्रत्यक्षात कचरा समस्या गंभीर आहे. पालिकेने याकडे लक्ष दिले नाहीतर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यातून भविष्यात संपूर्ण पुणे शहरात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होईल.
शहरात आठ कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत, त्यापैकी सात हडपसर मतदार संघात आहेत. आयुक्तांनी वेळ देऊनही ओपन डम्पिंग सुरूच आहे. न्यायालयाचा अवमान करून खिसे भरणाऱ्यांनी हे उद्योग बंद करावेत. नागरिकांचा जीव धोक्यात घालू नये, असा आरोप आमदार चेतन तुपे यांनी यावेळी केला. आयुक्तांनी आश्वासन देऊनही मोठ्या प्रमाणात कचरा डम्पिंग सुरू आहे. पालिकेतील भाजप सत्ताधारी राक्षसी बहुमताच्या जोरावर नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप नगरसेवक योगेश ससाणे यांनी केला. यावेळी खासदारांनी स्थानिक नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली.