वॉशिंग्टन – गेल्या आठवड्यातील 6 जानेवारी हा अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस ठरला. गेल्या 200 वर्षांत त्या देशात जे झाले नव्हते, ते त्या दिवशी घडले आणि संपूर्ण जगाला त्याचे ओंगळ दर्शन झाले.
पराभव अमान्य करणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल या संसदेच्या इमारतीत धुडगूस घातला आणि अमेरिकेची नाचक्की केली. त्यामुळे ट्रम्प रडारवर आले असून त्यांची हकालपट्टी करण्याचीच तयारी केली जात आहे.
इतकेच नव्हे, तर ट्रम्प यांची तुरुंगातही रवानगी होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यांच्या विरोधात महाभियोग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाण्याचेही संकेत मिळाला आहेत.
जर अशी कारवाई झालीच तर ट्रम्प यांच्याकडे बचावासाठी कोणता मार्ग असेल याबाबत काही तज्ज्ञांनी मते व्यक्त केली आहेत. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे प्रा. हर्ष प्रांत यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्राध्यक्ष या नात्याने ट्रम्प यांच्याकडे स्वत:ला माफ करण्याचा अधिकार आहे.
जर अमेरिकेच्या अध्यक्षांना अन्य कोणाला माफी देण्याचा अधिकार दिला आहे, तर ते स्वत:लाही माफ करू शकतात. अर्थात, अमेरिकेच्या इतिहासात यापूर्वी कोणत्या अध्यक्षांनी असा स्वत:ला माफ करण्याचा अधिकार वापरला नसल्यामुळे पंत यांनी याबाबत साशंकता व्यक्त केली. तथापि, ट्रम्प यांच्या विरोधात खटला दाखल झाला तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार व अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अधिकारांचा न्यायालय कसा अर्थ लावते यावर बरेच अवलंबून असणार आहे.
दरम्यान, महाभियोगाच्या प्रक्रियेपासूनही ट्रम्प स्वत:चा बचाव करू शकतात असा दावा प्रा. पंत यांनी केला आहे. तसेच ट्रम्प यांचा कार्यकाळ केवळ आठवडाभराचा आहे. त्यामुळे इतक्या कमी अवधीत ही कारवाई करणे अप्रस्तुत ठरेल असेही त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे सभागृहातील संख्याबळावरही महाभियोगाचे बरेचसे काम अवलंबून असेल.
एक मात्र खरे की ट्रम्प पदावरून पायउतार झाले तर मात्र त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकते. त्यांनी सरळ सरळ जमावाला चिथावणी दिल्याचा विरोधी डेमोक्रॅटीक पक्षाचा दावा असून ते ट्रम्प यांना याच मुद्द्यावरून घेरण्याच्या तयारीत आहेत.
त्यामुळे आता महाभियोगाच्या प्रक्रियेतून जरी ट्रम्प वाचले तरी नंतर जर कोणी हे प्रकरण लावून धरले तर त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. त्या वेळी मात्र त्यांना तुरुंगाची वारी करावी लागू शकते.