नवी दिल्ली – अवकाशातील महाकाय आकाराचे तारे अचानक कसे लुप्त होतात आणि अंतरीक्षातील तारांगणातील नेमक्या काय समस्या आहेत यावर आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थी संशोधकांनी महत्त्वाचे संशोधन केले असून त्यातून महत्त्वाचे निष्कर्ष निघाले आहेत. अमेरिका आणि जर्मनीच्या विद्यापीठांच्या सहकार्याने त्यांनी हे संशोधन केले आहे. ते नुकतेच एका आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकात प्रकाशितही झाले आहे.
त्यांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की अंतरीक्षातील महाकाय ताऱ्यांमध्ये अंतर्गत हालचालीतून काही बदल होतात आणि त्यातून मोठा स्फोट होऊन हे तारे अस्ताला जातात. या प्रचंड स्फोट घडण्याच्या प्रक्रियेला त्यांनी वैज्ञानिक भाषेत सुपरनोव्हे असे नाव दिले आहे. या सुपरनोव्हेची प्रक्रियाही या वैज्ञानिकांनी समजून घेतली आहे आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या छोट्या कणांचाही त्यांनी अभ्यास केला आहे.
या कणांच्या अभ्यासातून अंतरीक्षांच्या बऱ्याच अज्ञात बाबींवरही प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे. अंतरीक्षांतील महाप्रचंड स्फोटांमधूनच हे अंतरीक्ष निर्माण झाले आहे. पण ही नेमकी प्रक्रिया कशी घडली याचे कोणतेही ज्ञान अद्याप उपलब्ध झालेले नाही.
गुवाहाटी आयआयटीच्या भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक सोवन चक्रवर्तीै म्हणाले की, हे अंतरीक्षात होणारे स्फोट हे वैज्ञानिकांसाठी गूढच आहे. पण आमच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार न्युट्रॉन्समुळे हे स्फोट घडतात असे दिसून आले आहे. मृत होत जाणाऱ्या ताऱ्यांतून प्रथम न्युट्रॉन्स बाहेर पडतात त्यात ताऱ्यांतील 99 टक्के ऊर्जा साठवलेली असते. ताऱ्यांच्या आतल्या भागातील न्युट्रॉन्सचा बाह्य भागातील न्युट्रॉन्सशी संयोग होतो. हे रूपांतर अत्यंत अल्पावधीत होते. त्यातूनच सुपरनोव्हेची प्रक्रिया होते असेही त्यांनी नमूद केले.