भोपाळ – समाज माध्यमांपासून ते खासगी चर्चांपर्यंत २०२० हे वर्ष सर्वांसाठीच कसं-काय पनौती, अनलकी, अशुभ ठरलं याबाबतच्या चर्चा रंगताना दिसतात. यंदा ३१ डिसेंबरला तर अनेकांनी आपण नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नव्हे तर २०२० जात असल्याने त्याचे ‘सेलिब्रेशन’ करतोय असे संदेश पाठवत २०२० ला दूषणं दिली.
मात्र बहुतेकांसाठी अनलकी ठरलेला २०२० काहींसाठी मात्र फारच स्पेशल ठरलाय! कदाचित तुम्हाला, अवघ्या जगाला मेटाकुटीस आणलेला २०२० कोणाला लकी ठरला असेल हा दावाच अतिशयोक्ती वाटू शकतो. मात्र मध्यप्रदेशातील दोन खाणकामगारांची कथा वाचल्यानंतर तुम्हाला यावर नक्कीच विश्वास बसेल…
पहिली कहाणी आहे मोतीलाल प्रजापती या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराची. मोतीलाल हे मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका खाणीमध्ये मजुरीचे काम करतात. ऑक्टोबर २०२०मध्ये खाणीमध्ये काम करत असताना त्यांचं भाग्यच उजळलं.
मोतीलाल प्रजापती यांना काम करताना ४२.९ कॅरेटचा हिरा सापडला. नंतर त्यांनी डिसेंबर महिन्यात या हिऱ्याचा लिलाव लावला व त्याला २.५ करोड रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली. पन्ना येथे सापडलेला हा आजवरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा ठरला.
दुसरी कहाणी पन्ना येथीलच एका साधारण कंत्राटी खाणमालकाची आहे. आनंदीलाल खुशवाह असं या खाणमालकाचं नाव असून त्यांना १०.६९ कॅरेटचा हिरा सापडला. ज्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना दिली तेव्हा त्या हिऱ्याची किंमत तब्बल ५० लाख असल्याचं आढळलं. ही घटना जुलै २०२०मध्ये घडली असून यामुळे खुशवाह यांच्यासाठीही २०२० जबरदस्त लकी ठरलाय.