मुंबई – मागील काही दिवसांपासून राजकीय भाष्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने या संदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मुद्दयावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकारने दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, राम कदम यांना आता विशेष सुरक्षा नसणार. यामध्ये आणखी काही भाजप नेत्यांचा समावेश आहे.
अमृता फडणवीस यांना यापूर्वी वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा पुरविण्यात येत होती. यामध्ये कपात करण्यात आली असून त्यांना आता एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना पूर्वी असलेली झेडप्लस सुरक्षा कमी करण्यात आली असून त्यांना आता वायप्लस एस्कॉर्ट सुरक्षा असणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.