शिक्रापूर – शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दुरंगी लढत होत आहे. सत्ता आपल्याकडे यावीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलने जोरदार प्रचार सुरू असून मतदारही उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर उमेदवार घरोघरी जात नागरिकांची विचारपूस करीत आपले आगामी विकासाचे ध्येय मतदारांना विषद करीत आहेत.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत निवडणूक मध्ये गावातील शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून गौरीताई दत्तात्रय राऊत, रेखाताई सचिन मांढरे व गौरव अरुणदादा करंजे हे तिघे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
गावातील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून मोठ्या जल्लोषात आपल्या शिक्रापूर ग्रामविकास आघाडी या पॅनलचा प्रचार सुरू केला आहे. या प्रचारामध्ये महिलांनी मोठी आघाडी घेतली आहे.
वॉर्ड क्रमांक दोनमधून अनोख्या पद्धतीने उमेदवारांनी सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेत ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आपला प्रचार सुरू केला आहे, यावेळी या उमेदवारांनी यापूर्वी गावासाठी केलेल्या भरीव कामगिरी आणि योगदान आणि आगामी विकासाची दिशा मतदारांना भावत असल्याने मतदार खंबीरपणे या उमेदवारांच्या मागे उभे राहतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.
यावेळी मतदारांची चर्चा करताना गावातील कचरा, गटार व पाण्याच्या मुख्य समस्यांसह आदी सर्व प्रलंबित प्रश्न यापुढील काळामध्ये सोडविणार असल्याचे संबधित उमेदवार सांगत आहेत. नागरिक व मतदारांचा मोठा पाठींबा मिळत असल्याने हे उमेदवार विजयाची खात्री बाळगून आहेत.