करोनामुळे सुरू होते निः शुल्क उपचार
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची 7 रुग्णालये व 28 दवाखाने आहेत. या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अल्प शुल्क आकारण्यात येते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून रुग्णालयामध्ये शुल्क आकारणी बंद केली होती. आता जानेवारी महिन्यापासून पुन्हा रुग्णालयातील फी आकारणी सुरू करण्यात आली आहे.
बाह्य रुग्णांना येणाऱ्या शिंका, ताप, सर्दी, खोकला या साथीच्या आजारामुळे एकमेकांच्या हाताचा स्पर्श, वारंवार हाताळण्यात येणाऱ्या नोटा यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे फी आकारणी बंद केली होती. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनामध्ये बैठक झाली.
या बैठकीला अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय आधिकारी व सर्व ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये महापालिकेच्या 7 रुग्णालये व 28 दवाखान्यांमध्ये फी आकारणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार 1 एप्रिल 2020 पासून बंद असलेली फी आकारणी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सुरू करण्यात आली आहे. मात्र रुग्णालयांमध्ये नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन कऱणे, मास्क घालणे आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.