वाघोली – घरामध्ये लागलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट होऊन घरात ठेवलेली 10 लाखांची रोकड व 40 तोळे सोने जळाल्याची घटना भावडी (ता. हवेली) येथे रविवारी (दि. 3) दुपारी बाराच्या सुमारास घडली. स्फोटामध्ये घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भावडी गावठाण येथील भैरवनाथ मंदिराच्या समोर राहणारे बाळासाहेब दगडू तांबे हे पत्नीसह घर बंद करून वाघोली येथे गेले होते. काही वेळाने घरात आग लागल्याची माहिती तांबे यांना फोनद्वारे कळाली.
ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु आग आटोक्याच्या बाहेर असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना देखील बोलवण्यात आले. याचदरम्यान सिलिंडरचा स्फोटदेखील झाला.
वाघोली अग्निशमनदलाचे उपस्थानक अधिकारी विजय महाजन, चालक संदीप शेळके, फायरमन सचिन गवळी, योगेश मायनाळे, मयूर गोसावी, विकास गायकवाड यांच्या पथकाने लागलेली संपूर्ण आग आटोक्यात आणली. आगीमध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत.