नवी दिल्ली – देशाचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारून 96 पूर्णांक 16 शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात काल 20 हजार 963 रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 99 लाख 27 हजार 310 झाली. देशात सध्या करोनाचे 2 लाख 47 हजार 220 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात काल करोनाचे 18 हजार 177 नवे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत या आजाराचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या एक कोटी 3 लाखाच्या पुढे गेली आहे.
तपास, चाचणी, आणि उपचार या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन होत असल्याने रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ तर मृत्यू दरात घट होत आहे. देशाचा करोना मृत्यू दर सध्या 1 पूर्णांक 4 टक्के इतका असून तो जगात सर्वात कमी करोना मृत्यू दर असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
देशात काल करोनाच्या 217 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आतापर्यंत या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची एकूण संख्या 1 लाख 49 हजार 435 झाली आहे.
देशात काल 9 लाख 58 हजारापेक्षा जास्त करोना निदान चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या 17 कोटी 48 लाख इतकी झाल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे.