जमीन बळकावणारा कथित सीआयडी अधिकारी पिट्याभाईवर गुन्हा दाखल

सलग पाच वर्षे तक्रारी दिल्यावर पोलिसांची कारवाई

 

पुणे  – विधवा महिलेची जागा बळकावत तिला धमकावल्याबद्दल मेहबूब शेख उर्फ पिट्याभाई (रा.कावळे वस्ती, माळवाडी) आणि त्याच्या साथीदारांच्यावर वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पिट्याभाई हा सीआयडी अधिकारी किंवा पत्रकार असल्याचे सांगत अनेकांना धमकावत असल्याची बाबही तपासात पुढे आली आहे.

 

 

याप्रकरणी पिट्याभाईसह जावेद शेख उर्फ बिल्डर, शाम सुसगोहिरे, दिनकर सुसगोहिरे, शामराव गायकवाड (सर्व रा. वानवडी) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी ईस्ट (मुंबई) येथील महिलेची सय्यदनगर सर्व्हे नं. 75 मध्ये जागा आहे. पिट्याभाईने साथीदारांसह जागेचा बनावट दस्तावेज बनवले. यानंतर जागेचा ताबा घेत पत्राशेड उभारत ते बांगलादेशी नागरिकांना भाड्याने दिले.

 

 

या महिलेस पिट्याभाईने सय्यदनगर व मुंबई येथे जात वारंवार जीवे मारण्याची धमकीही दिली. अखेर महिलेने सलग पाच वर्षे पुणे पोलिसांकडे तक्रारी देत पाठपुरावा केला. तिने मेहबूब शेख याचे गॅंगस्टर, लॅंड माफियांशी संबंध असलेले पुरावे दिले. यानंतर तक्रारीची दखल घेत वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

 

राजकारणी, कुख्यात गुंडांसह छायाचित्रे

पोलिसांच्या माहितीनुसार पिट्याभाई पोलीस निरीक्षकाचा गणवेश घालून सीआयडी ऑफिसर, ह्युमन राइट्सचा पदाधिकारी आणि परिवर्तन संस्थेचा अध्यक्ष आहे तसेच पत्रकार असल्याची बतावणी करत होता. याप्रकारे दहशत माजवत जागा लुबाडणे, खंडण्या गोळा करणे असे उद्योग करतो. तसेच विविध मान्यवर आणि राजकारणी, कुख्यात गुंडांसोबतचे फोटो दाखवून तो दहशत निर्माण करतो. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जोगदंड करत आहेत.

 

 

पिट्याभाईला आश्रय कोणाचा?

वानवडी पोलीस ठाण्यातील वसुलीची कामे करणाऱ्या काही पोलीस कर्मचाऱ्यांशी पिट्याभाईचे चांगले हितसंबंध असल्याचे बोलले जात आहे. यामुळे त्याच्यावर अनेकदा गुन्हे दाखल होता होता वाचले. मात्र, अखेर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार वानवडी पोलिसांना पिट्याभाईवर गुन्हे दाखल करावे लागले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.