लंडन – ब्रिटन मध्ये सापडलेल्या करोनाच्या नवीन विषाणुचा जगभरातील तीस देशांमध्ये प्रादुर्भाव दिसून आला आहे. या विषाणुंच्या रूग्णांचा जगातील प्रसार वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणांपुढे हे एक नवे आव्हान सध्या निर्माण झाले आहे.
ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना जगभरात अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली असली तरी ब्रिटन मधील अनेक प्रवासी मागील तीन महिन्याच्या काळात जगाच्या विविध भागात प्रवास करून आल्याने त्यांच्या मार्फत या रोगाचा फैलाव झाला आहे.
या विषाणुंची लागण झालेली एक महिला रूग्ण आज व्हिएतनाम मध्ये आढळून आली. तेथील या विषाणुंचा हा पहिलाच रूग्ण आहे. तुर्कस्तानात या विषाणुंचे एकूण पंधरा आढळून आले आहेत.
अमेरिकेतील तीन राज्यांमध्ये ब्रिटीश विषाणुंचे रूग्ण आढळून आले आहेत. आर्यलंड मध्ये करोनाचे प्रमाण कमी होते पण आता तेथेही या ब्रिटीश विषाणूने थैमान घालायला सुरूवात केली आहे.