आतापर्यंत 7 कोटी 86 लाख रुपयांची बिले केली कमी
पुणे – एका बाजूला करोना बाधितांची संख्या कमी होत असतानाच, दुसरीकडे वाढीव बिले रुग्णांच्या माथी मारण्याचे प्रकार सुरुच आहे. शासनाने खासगी रुग्णालयांना नियमानुसार बिले आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही खासगी हॉस्पिटल्स जादा बिले आकारत आहेत.
मागील सात महिन्यांत पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांनी आकारलेली 7 कोटी 86 लाख रुपयांची बिले लेखा परीक्षणात कमी करण्यात आली आहे.
करोना रुग्णांकडून अवाजवी बिले आकारण्याच्या गैरप्रकारला आळा बसण्यासाठी खासगी हॉस्पिटलनी दिलेल्या दीड लाख रुपयांवरील रकमेच्या बिलांची तपासणी करण्याचा निर्णय जूनमध्ये विभागीय आयुक्तांनी घेतला. त्यासाठी दोन्ही शहरांबरोबरच ग्रामीण भागांतील हॉस्पिटलसाठी बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली.
महापालिकेतील लेखा विभागातील अधिकाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली. दीड लाखांपेक्षा अधिकचे बिल हे हॉस्पिटलकडून लेखापरीक्षण पथकाला दिले जाणार जाते. या बिलांची तपासणी केल्यानंतर जादा दर आकारण्यात आले असतील, तर त्याबाबतचे म्हणणे रुग्णालयांकडून मागविले जाते. आकारलेले बिल योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर ते बिल रुग्णांना अथवा नातेवाईकांना दिले जाते. त्यामध्ये जादा बिले आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
पुणे जिल्ह्यात वाढीव बिलाच्या एकूण 4 हजार 709 तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार या वाढीव बिलातून 7कोटी 86 लाख 97 हजार रुपयांची रक्कम कमी करण्यात आली आहे.