तिरूअनंतपूरम – केरळची राजधानी तिरूअनंतपूरम येथील 21 वर्षीय आर्या राजेंद्रन यांनी नवीन विक्रम रचला आहे. नुकत्याच झालेल्या केरळमधील स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले असून आर्या यांची महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी आज तिरूअनंतपूरमच्या महापौरपदाची शपथ घेतली. या निवडीमुळे आर्या देशातील सर्वात तरूण महापौर बनल्या असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा रेकाॅर्ड मोडला आहे.
माकप जिल्हा व राज्य समितीने आर्या यांची एकमताने महापौर पदासाठी उमेदवारी मंजूर केली होती. त्यानुसार, आज जिल्हाधिकारी नवज्योत खौसा यांनी आर्या राजेद्रन यांना शपथ दिली. आर्या यांनी 99 पैकी 54 मते मिळवून महापौर पदासाठी विजय मिळवला.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वयाच्या 27 व्या वर्षी महापौर झाले होते. देशातील सर्वात तरूण महापौर म्हणून त्यांच्या नावे विक्रम होता. मात्र, आर्या यांनी 21 वर्षी महापौर पद मिळवून फडणवीस यांचा विक्रम मोडला आहे.
आर्या ह्या तिरूअनंतपूरम येथील सर्व संत महाविद्यालयात बीएससी गणित च्या द्वितीय वर्षात शिकत आहेत. आर्या राजकारणात खूप सक्रिय आहेत. त्या भारतीय महासंघाच्या राज्य समितीच्या सदस्य आहेत. निवडणुकीपूर्वी आर्या यांनी म्हटले होते की, ‘जर निवडून आले तर चालू असलेली सर्व विकासकामे सुरू ठेऊन प्राथमिक शाळांच्या श्रेणी सुधारित करण्यावर भर देईन. तसेच या जबाबदारीने शिक्षणातही खंड पडून देणार ऩाही,’ असे आर्या यांनी म्हटले होते.